बीड : साताऱ्यातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे . डॉक्टर तरुणीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचं लिहीत गुरुवारी (23 ऑक्टोबर ) रात्री रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात नवनवे खुलासे झाले . तरुणीच्या कुटुंबीयांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत . दोन दिवसांपूर्वी फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी आज तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आहे .
राहुल गांधींचा तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद
फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे .
पीडित डॉक्टर महिलेच्या वडिलांची प्रतिक्रिया...
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते . राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. तुम्हाला आता काय हवंय ? असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी चौकशी आणि आरोपींना फाशी या दोन्ही गोष्टीची मागणी केली... यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केला आहे.